मुंबई : एसबीआयच्या सहा लाखांहून जास्त डेबिट कार्डधारकांची कार्ड्स ब्लॉक केली असतानाच आता इतर बँकांच्या ग्राहकांची ई-सुरक्षाही धोक्यात आली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस आणि अॅक्सिस बँकेच्या सुमारे 32 लाख ग्राहकांची कार्ड्स करप्ट झाल्याची माहिती आहे.


संबंधित बँकांच्या ग्राहकांना कार्ड रिप्लेस करण्याच्या किंवा सिक्युरिटी कोड (पिन नंबर) बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुमारे 32 लाख डेबिट कार्डधारकांची सुरक्षा धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चीनमधल्या काही ठिकाणांहून आपल्या बँक खात्यात व्यवहार झाल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. त्यानंतर तातडीने ही पावलं उचलण्यात येत आहेत. हिताची पेमेंट सर्व्हिसेसच्या सिस्टममधून मालवेअर आल्याने खासगी माहिती चोरुन फसवणूक होण्याची भीती आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

एचडीएफसी काय म्हणतं?


एचडीएफसी वगळता इतर एटीएममधून व्यवहार करणाऱ्या एचडीएफसीच्या ग्राहकांना पिन बदलण्याच्या सूचना काही आठवड्यांपूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे फक्त एचडीएफसी बँकेच्याच एटीएममधून पैसे काढण्याचंही सुचवण्यात आलं आहे. इतर बँकांमधील एटीएमची ई-सुरक्षा तितकी चांगली नसल्याची शक्यता वर्तवत एचडीएफसीने या सूचना दिल्या आहेत.

SBI च्या 6 लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स पूर्वसूचनेविना ब्लॉक


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत. एसबीआयच्या सिस्टीममध्ये सुरक्षेशी निगडीत बग शिरण्याच्या भीतीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बँकेतर्फे ही पावलं उचलण्यात आली आहेत.

ऐन दिवाळीच्या तोंडावर कुठलीही पूर्वसूचना न देता कार्ड्स अचानक ब्लॉक झाल्यामुळे कार्डहोल्डर हैराण झाले. त्यानंतर बँकेकडून ईमेल आणि एसएमएस पाठवण्यात आले. संबंधित ग्राहकांना नवीन डेबिट कार्ड्स दिली जातील. त्यासाठी आपापल्या ब्रँचमध्ये नव्या कार्डसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय बँकिंगच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कार्ड रिप्लेसमेंट मानली जात आहे.

SBI : ब्लॉक झालेलं ATM पुन्हा कसं सुरु करावं?


एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर एसबीआयकडून ग्राहकांना नवीन कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना आपल्या बँक शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

बँकेकडून ग्राहकांना फॉर्म दिला जाईल. त्या फॉर्मवर बँक खात्याशी संबंधित सर्व माहितीचा तपशील द्यावा लागेल. फॉर्म भरताना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अशी कागदपत्रं जवळ असणं गरजेचं आहे.

बँकेकडून पासवर्ड बदलण्याचं आवाहन


एटीएमच्या गैरव्यवहारापासून सुरक्षित राहण्यासाठी ग्राहकांनी पासवर्ड बदलावे, असं आवाहन बँकेकडून करण्यात आलं आहे. कुणाचा पासवर्ड किंवा कसलीही माहिती हॅक झाली असल्यास पासवर्ड बदलल्यामुळे गैरव्यवहार रोखता येऊ शकतात.