पणजी : गोव्याबाहेरुन येणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार नाहीत. असा अजब निर्णय गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांवर होणारे मोफत उपचार आता यापुढे होणार नाहीत.


‘मी गोव्याचा आरोग्यमंत्री आहे, त्यामुळे गोवेकरांचा विचार आधी करणार.’ असंही विश्वजीत राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सामंजस्य कराराच्या माध्यमातून गोव्याला भरपाई कशी मिळवून देता येईल. याबाबतही चर्चा करणार असल्याचं विश्वजीत राणेंनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आरोग्यमंत्री?

‘गोव्याबाहेरील रुग्णांवर कोणत्याही परिस्थितीत मोफत उपचार केले जाणार नाहीत. महाराष्ट्र सरकारला त्यांच्याकडील रुगणांवर मोफत उपचार हवे असतील तर त्यांनी त्यासाठी लागणारे पैसे गोवा सरकारला द्यायला हवे. हे पैसे कोणत्या स्वरुपात दिले आणि घेतले जातील यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होऊन तोडगा काढला जाईल.’

'निलेश राणेंची दादागिरी गोव्यात चालू देणार नाही'

याच प्रकरणावरुन नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी गोवा बंदची हाक दिली होती. त्यांच्या या वक्तव्याचाही विश्वजीत राणे यांनी समाचार घेतला. ‘निलेश राणे यांची दादागिरी गोव्यात चालू देणार नाही, ही मुंबई नाही.’ असं विश्वजीत राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आज (बुधवार) देवेंद्र  फडणवीस यांना भेटून तोडगा काढण्यात येणार आहे.