नवी दिल्ली : नऊ हजार कोटी रुपयांची फसवणूक करुन देशाबाहेर पसार झालेल्या विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करा, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. फेरा उल्लंघन प्रकरणी मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालय (ईडी) ला कोर्टाने दिले आहेत.

मल्ल्यावरील कारवाईचा अहवाल येत्या 8 मेपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही ईडीला देण्यात आल्या आहेत. दिल्ली न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी दीपक शेरावत यांनी हे आदेश दिले.

मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. या कामात बंगळुरु पोलिस ईडीला मदत करणार आहे.

उद्योगपती विजय मल्ल्याने 17 बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पलायन केलं. गेल्या वर्षी जून महिन्यात मल्ल्याला फरार घोषित करण्यात आलं होतं. त्याला भारतात आणण्याचे जोरदार प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहेत.
मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. तर एप्रिलमध्ये भारताने विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केला होता.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कर्ज घोटाळ्याप्रकरणी मल्ल्याची मुंबई आणि बंगळुरुतील एक हजार 411 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने याआधीच जप्त केली आहे. मल्ल्याची 34 कोटी रुपयांची बँकेतील रोख रक्कम, मुंबई आणि बंगळुरुतील अनुक्रमे 1300 आणि 2291 चौरस फुटांची घरं, चेन्नईतील 4.5 एकरचा औद्योगिक भूखंड, कुर्गमधील 28.75 एकरवरील कॉफीची बाग, युबी सिटी आणि बंगळुरुतील निवासी आणि औद्योगिक बांधकामं यांचा समावेश होता.