पणजी : गोव्यात हणजूण पोलिसांनी धडक कारवाई करत विदेशी नागरिकाद्वारे चालविली जात असलेली ड्रग्सची प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली. या धाडीत विविध प्रकारच्या रसायनासह सुमारे 1 कोटी 3 लाख किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. यंदाच्या पर्यटन हंगामातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.


हणजूण येथील स्टारको जंक्शनजवळ ड्रग्सची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हणजूणचे पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विदेश पिळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. त्यात कोलेर ख्रिस्तीना (35) हा ऑस्ट्रियन नागरिक संशयितरित्या फिरताना सापडला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता  त्याच्याकडे एमडीएमए, डीजीएल, चरस, कॅटामाईन, अॅतफ्टामाईन असे एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचे ड्रग्स सापडले.

कोलेर ख्रिस्तीनाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या माझलवाडो-हणजूण येथील भाड्याच्या घराची झडती घेतली. याठिकाणी पोलिसांना ड्रग्स तयार करण्याची रासायनिक प्रयोगशाळा असल्याचे आढळले. त्या ठिकाणी विषासह 21 प्रकारची विविध रसायने व ड्रग्स बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल सापडला. त्या सर्वांची किंमत 1 कोटी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांना त्या घरातून दोन फ्रिज, रासायनिक प्रयोगशाळेसाठी लागणारे सर्व सामान सापडले. पोलिसांनी सर्व सामान ताब्यात घेऊन संशयित कोलेर याच्या विरूद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केली आहे.