नवी दिल्ली : उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत. भारत-पाकिस्तानमधील सिंधू नदी पाणीवाटप करारावर फेरविचार करण्याचा इशारा दिल्यानंतर, आता पाकिस्तानसोबतचा शस्त्रसंधी करार तोडण्याचा विचार भारत करत आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दिल्लीत पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होत आहे. या बैठकीत शस्त्रसंधीच्या करारबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला मंत्रिमंडळाचे वरिष्ठ मंत्री, तीनही सैन्यदलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित आहेत.

2003 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाला होता. तोच करार आता तोडण्याचा भारताचा विचार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

उरी हल्ला : अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल


उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या कठोर पवित्र्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानने दोन वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जम्मू काश्मीरच्या हंदवाडा आणि मेंढरमध्ये गोळीबार केला.

दरम्यान, आज परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये पाकिस्तानबाबत मोठा निर्णयाची घोषणा होऊ शकते.