नवी दिल्ली : अल्पसंख्यांकांसोबत कसं वागायचं हे आम्ही मोदी सरकारला दाखवू, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी इम्रान खान यांना आरसा दाखवला आहे. अल्पसंख्यांकांच्या अधिकारांबाबत भारताला पाकिस्तानकडून शिकण्याची आवश्यकता नाही. त्याउलट पाकिस्तानने भारताकडून शिकायला हवे.


ओवेसी म्हणाले की, "पाकिस्तानी संविधानानुसार केवळ एक मुस्लिम व्यक्तीच पाकिस्तानचा राष्ट्रपती होऊ शकतो. परंतु भारतात वंचित सामुदायाचे अनेक राष्ट्रपती होऊन गेले आहेत. सर्व समावेशक राजकारण आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारांबाबत पाकिस्तानने भारताकडून शिकायला हवे."

काय म्हणाले होते इम्रान खान
"भारतात अल्पसंख्यांकांना इतर नागरिकांप्रमाणे वागणूक मिळत नसल्याचं भारतातील काही लोक म्हणत आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांकांसोबत कसं वागायचं हे आम्ही मोदी सरकारला दाखवू," असे वक्तव्य इम्रान खान यांनी केले होते. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल आणि त्यांना समान अधिकार मिळतील", असं आश्वासनही इम्रान खान यांनी पाकिस्तानी नागरिकांना दिले.

काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह
गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे. समाजात विष पसरले जात आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल. मला माझ्या मुलांची चिंता वाटते, अशा शब्दांत देशातील परिस्थितीबद्दल नसरुद्दीन शहा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत बोलताना इम्रान खान यांनी भारताबाबत वक्तव्य केले होते.

संबधित बातम्या: 

इथे सैनिकांवरही हल्ले होतात, अजून किती स्वातंत्र्य हवं : अनुपम खेर

अल्पसंख्यांकांसोबत कसं वागायचं हे मोदी सरकारला दाखवू : इम्रान खान

मुलांना भारतात ठेवायची भीती वाटते : नसीरुद्दीन शहा