नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर आता आयएमडीच्याही मॅपवर. भारतीय वेधशाळा देशातल्या विविध भागांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर करते. त्यात शुक्रवारपासून त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख सुरु केला. मुजफ्फराबाद, गिलगिट, बल्टिस्तान या जागांचा स्वतंत्र उल्लेख आयएमडीने सुरु केला आणि त्यावरुन तिकडे पाकिस्तानचा जळफळाट व्हायला सुरुवात झाली. भारताचं हे पाऊल बेकायदेशीर असून याआधीही त्यांनी असे नकाशे आणण्याचा निरर्थक प्रयत्न केल्याची टीका पाकिस्तानकडून सुरु झाली.
काश्मीर खोऱ्याचा अंदाज देताना आयएमडीकडून आधी जम्मू काश्मीर असाच उल्लेख असायचा. पण आता जम्मू काश्मीर, लडाख, मुजफ्फराबाद, गिलगिट बल्टिस्तान असा तपशीलवार उल्लेख सुरु झाला. मुजफ्फराबाद हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतं. तर गिलगिट, बल्टिस्तान हे भाग पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा भारताचा आरोप आहे.
कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित भाग बनवण्यात आले. तेव्हापासूनच हा उल्लेख सुरु केल्याचं आयएमडीचं म्हणणं आहे. फक्त आधी हा उल्लेख प्रादेशिक हवामान वृत्तात यायचा. आता मात्र आयएमडीच्या नॉर्थ वेस्ट वेदर झोनमध्येही त्यांचा स्वतंत्र उल्लेख सुरु केला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर रोज प्राईम टाईममध्ये हे वेदर बुलेटिन दाखवलं जातं. लवकरच खासगी चॅनेलही वेदर बुलेटिनमध्ये पीओकेचा उल्लेख करतील असं माहिती आणि प्रसारण खात्याने म्हटलं आहे.
आयएमडी ही खरंतर केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातली एक महत्त्वाची हवामान विषयक संस्था आहे. याआधीही केवळ भारतातच नव्हे इतर आपल्या शेजारी राष्ट्रांनाही वादळ-पावसाचे काही अंदाज आयएमडीने वर्तवले आहेत. पण सध्याच्या काळात याची इतकी जोरदार प्रतिक्रिया पाकमध्ये आली कारण, कलम 370 नंतर अनेकदा पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी ठासून सांगितलं आहे.
कोरोनाच्या संकटातही काश्मीरमधली सीमा धुमसते आहे. चार दिवसांपूर्वी झालेलं हंडवाडा एन्काऊंटर हे त्याचाच भाग. पाकच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी ही भारताची स्ट्रॅटेजिक आखणी आहे. ज्या ज्या माध्यमातून आक्रमकता दाखवता येईल ती दाखवत राहणे हे याच धोरणाचा भाग. ते आवश्यक आहेच. पण सोबत शेतकऱ्यांना वादळ-पावसाचे अचूक अंदाज वर्तवणे हे आयएमडीचं मुख्य काम आहे. इतर प्रगत राष्ट्रंच्या तुलनेत आपण यात अजूनही मागे आहोत. शेतकऱ्यांचं नुकसान अशा अचूक अंदाजांनी वाचवणं ही देखील राष्ट्रभक्तीच आहे हे देखील विसरायला नको.
VIDEO | भारताचं एक पाऊल आणि पाकिस्तानात हल्लकल्लोळ