नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटात सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यंदा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) यांच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात कोणत्याही अभ्यासक्रमाच्या शुल्कात वाढ होणार नाही. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे. आयआयटीच्या शुल्कात दरवर्षी दहा टक्क्यांना वाढ होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.


रमेश पोखरियाल निशंक म्हणाले की, "मी या मुद्द्यावर आयआयटी परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तसंच आयआयटी संचालकांशी चर्चा केली. यादरम्यान त्यांनी 2020-21 या शैक्षणिक वर्षात शुल्कात वाढ न करण्यास सहमती दर्शवली आहे. तसंच इतर कोणत्याही अभ्यासक्रमाचं शुल्क वाढवणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.





मागील वर्षी आयआयटीमध्ये मास्टर्स ऑफ टेक्नोलॉजी (M.Tech) अभ्यासक्रमाचं शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2020 च्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणाऱ्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाची फी वाढवून 2 लाख रुपये करण्यात येणार होती. परंतु सध्या या शुल्कात कोणतीही वाढ होणार नाही. यासोबतच आयआयआटीने आपल्या अंडरग्रॅज्युएशन प्रोग्राम कोर्सच्या विद्यार्थ्यांना 10 टक्क्यांची सूटही दिली आहे.


आयआयआयटीमध्ये प्रत्येक सेमिस्टरची फी आणि ट्यूशन फी लाखोंच्या घरात आहे. आयआयआयटीच्या अभ्यासक्रम शुल्कात दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढ होते. यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सरकारने आयआयटी तसंच आयआयआयटी परिषदेसोबत चर्चा केली. यानंतर सरकारच्या आवाहनानंतर परिषदेने अभ्यासक्रम शुल्क न वाढवण्याचा निर्णय घेतला.


एमटेकच्या शुल्कावरुन वाद
मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून आयआयटीमध्ये मास्टर्स ऑफ टेक्नोलॉजी (M.Tech) अभ्यासक्रमाचं शुल्क 900 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर ऑल इंडिया इंजिनिअरिंग स्टुडंट काउन्सिलने या निर्णयाचा विरोध केला होता.