नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी आठवडा शिल्लक आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 एप्रिल) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसह बातचीत करतील. देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदींची ही तिसरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे.


कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत कशाप्रकारे काम करायचं आहे आणि आणखी काय उपाययोजना कराव्या लागतील, यासह 3 मेपर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनबाबतही या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.


11 एप्रिल रोजी मागच्या संवादाच्या वेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन, जो 14 एप्रिल रोजी संपणार होता, वाढवण्याची शिफारस होती. त्यानंतर पंतप्रधानांनी 14 एप्रिलला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. तर त्याआधी पहिल्या लॉकडाऊनच्या घोषणेआधी म्हणजेच 20 मार्च रोजी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत केली होती. त्यावेळी मोदींनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली होती.


केंद्र आणि राज्य सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी विविध ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करत आहे. परंतु कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तसंच प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही राज्ये लॉकडाऊनचा कालावधी 3 मेनंतरही कायम ठेवण्याबाबत आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे.


Narendra Modi | ... म्हणून जगभरात भारताचं कौतुक होतंय : पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (26 एप्रिल) 'मन की बात' म्हटलं की, "देश एका युद्धाला सामोरा जात आहे. लोकांनी खबरदारी आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना व्हायरस आमच्या शहरात, गावात किंवा कार्यालयात पोहोचलेला नाही असा काही लोकांना अतिआत्मविश्वास आहे. परंतु तो पोहोचणारच नाही, असं नाही. ही चूक कधीही करु नका. जगभरातील अनुभवावरुन हे लक्षात येईल."


दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयने शुक्रवार रात्री उशिरा आदेश जारी करत, मॉल वगळता काही दुकानं सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट आणि कन्टेंटमेंट झोनमध्ये हे नियम लागू नव्हते.


PM Modi | Mann Ki Baat |स्थानिक प्रशासन,राज्य सरकार आपल्या जबाबदारीचं पालन करत आहेत : पंतप्रधान मोदी