रेहान नावाच्या या आरोपीविरोधात पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र ज्याने तंजील अहमदवर गोळी झाडली, तो शूटर अद्याप सापडलेला नाही.
तंजील यांच्या हत्येचं रहस्य एका पिस्तुलामुळे उघड झालं. बिजनौरमध्ये एका दरोड्यादरम्यान वापरलेल्या पिस्तुलातून तंजील यांच्यावर गोळी झाडली. दरोड्याच्या त्या गुन्ह्यात मुनीर नावाचा आरोप होता, त्याच्याच आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
दुसरीकडे तंजील यांची हत्या वैयक्तिक वादातून झाल्याची शंका उत्तर प्रदेश पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र हे दहशतवाद्यांचंही कृत्य असू शकतं, असाही अंदाज आहे. कारण तंजील हे पठाणकोट हल्ल्याच्या तपास करत होते.
उत्तर प्रदेशातल्या बिजनौरमध्ये हत्या
तंजील शनिवारी दोन एप्रिलला आपल्या पुतणीच्या लग्ना सोहळा आटोपून परिवारासोबत परतत होते. यावेळी मोटारसायकलवरुन पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने तंजील यांच्यावर आपल्या ‘9 एम एम’ पिस्तुलीच्या सहाय्याने 21 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तंजील अहमद यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पत्नीला एक गोळी लागली आहे.
कोण होते तंजील?
तंजील अहमद हे एनआयएच्या ऑपरेशन कोअर टीममधील एक महत्त्वाचे सदस्य होते. मोठमोठ्या दहशतवादी हल्ल्यांच्या चौकशी पथकातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठानकोट हल्ल्याच्या चौकशी पथकातही ते सहभागी होते. पाकिस्तानहून जेव्हा जेआयटी आली होती, तेव्हा त्यांच्या टीमसोबत ते पाच दिवस होते.