चेन्‍नई : तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दोन दिवस दोन्ही देशांमधील संबंधांबाबत अनौपचारिक बातचीत केली. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान हिंदी भाषेत सहज संवाद साधणारे पंतप्रधान मोदी यांनी मंदारिन भाषा बोलणाऱ्या चीनच्या राष्ट्रपतींशी अनेक वेळा त्यांच्याशी बातचीत केली. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील ही भाषेची अडचण भारताच्या एका महिला आयएफएस अधिकाऱ्याने चुटकीसरशी सोडवली. या आयएफएस अधिकाऱ्याचं नाव आहे प्रियांका सोहानी.


सावलीसारख्या मोदींसोबत
आयएफएस प्रियांका सोहानी दोन दिवस पंतप्रधान मोदींसोबत सावलीसारख्या राहिल्या. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मंदारिन भाषेत बोललेल्या वाक्यांचा हिंदीत अनुवाद केला. अशाचप्रकारे पंतप्रधान मोदींनी हिंदीत बोललेल्या वाक्यांचा मंदारिनमध्ये अनुवाद केला. शी जिनपिंग यांनी अनेक वेळ पंतप्रधान मोदींकडून भारतीय संस्कृती आणि प्रतिकांबद्दल माहिती घेतली. यावेळी सोहानी यांनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांना समजण्यास मदत केली.

प्रियांका सोहानी 2012 बॅचच्या आयएफएस अधिकारी
प्रियांका सोहानी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक परंतु अतिशय महत्त्वाच्या बातचीतदरम्यानही उपस्थित होत्या. 2012 बॅचच्या आयएफएस अधिकारी प्रियांका सोहानी यांनी परराष्ट्र मंत्रालयाचं बेस्‍ट ट्रेनी ऑफिसरचं सुवर्ण पदकही जिंकलं आहे. उत्तम कामगिरीसाठी तत्‍कालीन परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी प्रियांका सोहानी यांना बिमल सान्‍याल पुरस्‍काराने सम्‍मानित केलं होतं.

प्रियांका 2016 पासून चीनमधील भारतीय दूतावासात तैनात
प्रियांका सोहानी 2016 पासून चीनमधील भारतीय दूतावासात तैनात आहेत. परराष्ट्र धोरणाचा हा काळ फारच व्यापक असून वेगाने बदलत आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना कायमच तयारी करण्याची गरज असते, असं प्रियांका सोहानी म्हणतात. त्यांनी यूपीएससी परीक्षेत 26 वं स्थान मिळवलं होतं, तर महाराष्‍ट्रातून तिसऱ्या स्थानावर होत्या.