मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने सचिन वाझे अटक प्रकरणात शिवसेना आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे अटक प्रकणाचा योग्य तपास केला तर सत्य बाहेर येईल आणि शिवसेनेचं सरकार कोसळेल असं तिने म्हटलं आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री एनआयएने अटक केली आहे.
कंगना रनौतने या प्रकरणावर एक ट्वीट केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं आहे की, "या प्रकरणात एक मोठं कारस्थान शिजत आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. याचा जर योग्य तपास केला तर केवळ या प्रकरणातील रहस्यचं बाहेर येणार नाही तर राज्यातील सरकार कोसळेल. त्याचवेळी माझ्यावर 200 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतील असंही माझं मन सांगतंय. जय हिंद."
-
कंगनाच्या या ट्वीटची चर्चा सध्या सर्वत्र होतेय. तिने या आधीही राज्य सरकार आणि विशेषकरून शिवसेनेवर सातत्याने निशाणा साधलाय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेना आणि कंगणा रनौत यांच्यात शाब्दिक युध्द पहायला मिळतंय.
Sanjay Raut | केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यामातून राज्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न : संजय राऊत
मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. स्पोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला या प्रकरणात एकूण 5-7 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी तीन अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या शिवाय आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सचिन वाझेंवर कोणती कलमान्वये कारवाई?
NIA ने सचिन वाझे यांच्यावर आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये कलम 286- जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे, कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, कलम 506(2) – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे, कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे, स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे याचा समावेश आहे.
Sachin Vaze Arrested | वेळ नाही म्हणून आईच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते एपीआय सचिन वाझे