रायपूर : केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर देशातील प्रत्येक गरीबाला किमान वेतन देण्याचा निर्णय आम्ही घेऊ, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हे आश्वासन दिले आहे. जगातील एकाही सरकारनं आतापर्यंत असा निर्णय घेतला नसल्याचंही यावेळी राहुल म्हणाले.


छत्तीसगडमधील अटलमध्ये किसान आभार संमेलनात त्यांनी हे आश्वासन दिलं आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही देशात सत्तेवर आलो तर देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात किमान वेतन देऊ. जेणेकरुन देशात कोणतीही व्यक्ती गरीब आणि उपाशी राहणार नाही, असं ते म्हणाले.

आम्हाला दोन भारत नको आहे. आम्हाला एकत्र भारत हवा आहे. याच एकत्र भारतात आम्हाला जगात कोणत्याच देशाने किमान वेतनाचा निर्णय घेतला नाही, असा निर्णय काँगेस सत्तेवर आल्यावर घ्यायचा आहे, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं.

मी जे बोलतो ते पूर्ण करतो
मी जे काही बोलतो ते पूर्ण करतो, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला आहे. काँग्रेस सरकारने मनरेगाच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेला रोजगाराची हमी दिली. माहितीचा आधिकार दिला, असं राहुल गांधी म्हणाले. याच दरम्यान राहुल गांधींनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रही वाटप केले.

त्याचसोबत काँग्रेसला विजयी केल्याबद्दल त्यांनी छत्तीसगडच्या जनतेचे आभारही मानले. राहुल गांधी यांच्या या आश्वासनाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर किती होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.