राऊत म्हणाले की, "लोकसभा निवडणूक पार पडून आता नवे सरकार अस्तित्वात आले आले आहे. भाजपप्रणित एनडीएने विक्रमी 352 जागा जिंकत सरकार बनवले आहे. त्यामुळे आता राम मंदिराचे काम पूर्ण व्हायला हवे."
राऊत म्हणाले की, "एकट्या भारतीय जनता पक्षाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 303 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत. भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल. परंतु जर तसे झाले नाही, तर या देशातील जनता पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवणार नाही."
1992 पासून अनेक निवडणुकांमध्ये अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने राम मंदिराचा मुदा पुन्हा उपस्थित केला. जनतेने भाजप आणि मित्रपक्षांवर विश्वास टाकून त्यांना निवडून दिले. परंतु मोदी सरकार राम मंदिर बांधू शकले नाही.
2019 च्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान भाजपने पुन्हा एकदा तोच मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे जर यावेळीसुद्धा भाजप सरकार राम मंदिर बांधू शकले नाही. तर लोकांचा भाजपसह मित्रपक्षांवरचा विश्वास उडेल.
दरम्यान, नवे सरकार अस्तित्वात आले आहे, मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे आणि आता सरकारचे कामकाजही सुरु झाले आहे. परंतु संसदेच्या सभागृहातील कामकाज अद्याप सुरु झालेले नाही. लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक अजून शिल्लक आहे. त्यातच आता एनडीएतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पक्ष त्या पदावर आतापासूनच आपला अधिकार सांगत आहे. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनेही या पदावर दावा केला आहे.
"हे पद आमचा अधिकार आहे आणि तो मिळायलाच हवा", अशी शिवसेनेची मागणी आहे. लोकसभा उपाध्यक्ष पदाबाबत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत आज (6 जून) म्हणाले की, "ही आमची मागणी नाही, हा आमचा नैसर्गिक दावा आणि अधिकार आहे. हे पद शिवसेनेलाच मिळायला हवं."