ABP Network Ideas of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India Summit 2023) परिसंवादामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सह सरकार्यवाहक डॉ. कृष्ण गोपाल (Dr.Krishna Gopal) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पाकिस्तान आणि जातीय जनगणना यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. कंगाल पाकिस्तानला भारताची मदत का नको? याचं कारणंही गोपाल यांनी सांगितलं आहे.
कंगाल पाकिस्तानला भारताची मदत का नको?
डॉ. कृष्ण गोपाल यांनी सांगितलं आहे की, 'सर्वे भवन्तु सुखिनः' असे भारताचे विचार आहेत. जगात सर्व सुखी असावेत, कोणीही माणूस उपाशी राहू नये, असा याचा अर्थ आहे. आपल्या शेजारील देश पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे, पण तरीही सीमेवर पाकिस्तानकडून आपल्यावर वारंवार हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानने भारताकडे उदार मनाने मदत मागितली तर भारत नक्कीच मदत करेल. ही भारताची परंपरा आहे. भारताने कोरोना काळात गरजू देशांना मदत केली. पण पाकिस्तान शत्रुत्व सोडण्यास तयार नाही, असं डॉ. कृष्ण गोपाल यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानकडून भारतावर चार वेळा आक्रमण
डॉ. कृष्ण गोपाल पुढे म्हणाले, ''पाकिस्तानने आपले चित्त शांत ठेवावे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने भारतावर चार वेळा आक्रमण केले आहे. पाकिस्तानने आपल्या स्वभावात सुधारणा करून शत्रुत्वाची भावना कायमची सोडली पाहिजे. पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवतो त्यामुळे पाकिस्तानसोबत संबंध सामान्य होणं कठीण आहे.''
पाकिस्तानची निर्मिती शत्रुत्वाच्या आधारे : कृष्ण गोपाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाहक डॉ. कृष्ण गोपाल यांनी पुढे सांगितलं की, "पाकिस्तानची निर्मिती शत्रुत्वाच्या आधारे झाली आहे. जिन्ना आणि इक्बाल यांच्या विचारामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली. आपण हिंदूंसोबत राहू शकणार नाही, असे त्यांना वाटत होते पण ते चुकीचे होते. मुस्लिम बांधव भारतात खूप समानतेने राहतात. लोकसंख्याही 3.5 कोटींवरून 14.5 कोटी झाली आहे. पाकिस्तानात हिंदू तेव्हा अकरा टक्के होते आणि आता फक्त एक टक्के राहिले आहेत."
जात जनगणनेबाबत डॉ. कृष्ण गोपाल म्हणाले, "जात जनगणना राजकीय आहे, असे आम्हाला वाटते. प्रत्येक जात मोजण्याचं कारण काय? समाजातील सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे, यात शंका नाही. तसेच जातीभेद आणखी वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जातीय भेदभाव वाढेल, जातीय अस्मिता संपेल, असं कोणतंही काम करु नये, ही आमची इच्छा आहे.'
एबीपी नेटवर्क 'आयडियाज ऑफ इंडिया'
एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) हा परिसंवाद 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून यंदाची थीम 'नया इंडिया' (Naya India) आहे. या परिसंवादामध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :