नवी दिल्ली : ICSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये दहावीच्या निकालात महाराष्ट्राचाच बोलबाला पाहायला मिळाला. कारण या निकालात पुणे आणि मुंबईने अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे.
पुण्याच्या मुस्कान पठाणने 99.4 टक्के गुण मिळवले आहेत. तर तिच्यासोबत बंगळुरुच्या अश्विन रावनेही 99.4 टक्के गुण मिळवले आहेत. दोघांनीही दहावी ICSE बोर्डातून पहिला क्रमांक मिळवला. मुस्कान पठाण ही पुण्यातील हचिंग्स स्कूलची विद्यार्थीनी आहे.
मुंबईतील वरळी येथील ग्रीनलॉन्स स्कूलच्या फरझान भरुचाने 99.20 टक्के गुणांसह देशातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर फरझान एवढेच म्हणजे 99.20 टक्के गुण असणाऱ्या बंगळुरुच्या देवश्रीचाही देशातून दुसरा क्रमांक आला आहे.
त्यानंतर दहावीच्या निकालात केरळच्या मीनाक्षीने 99 टक्के आणि राघव सिंघलनेही 99 टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.
दहावीसोबतच ICSE बोर्डाचा बारावीचाही निकाल जाहीर झाला. ICSE बोर्डातून यंदा बारावीचे 96.47 टक्के विद्यार्थी पास झाले. कोलकात्याची अनन्या मैती 99.50 टक्के गुणांसह देशातून पहिली आली आहे. तर 99.25 टक्के गुण असणारे आयुषी श्रीवास्तव (लखनौ), दिव्येश लखोटिया (कोलकाता), रिशीका धारीवाल (मुंबई) यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे.