नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर आज दुपारी 3 वाजता हा सामना सुरु होत आहे. टीम इंडियाच्या विजयासाठी संपूर्ण देशभरात देवाला साकडं घातलं जात आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदचे मामा मेहबूब हसन आपल्या भाच्याच्या विजयाऐवजी टीम इंडियाला चिअरअप करत आहेत.

सरफराजचे मामांना या सामन्यात सरफराजचं प्रदर्शन चांगलं असावं अशी अपेक्षा आहे, पण हा सामना भारतानंच जिंकावा, असं त्यांचं म्हणणं आहे.



वास्तविक, सरफारजचे मामा उत्तर प्रदेशमधील इटावाचे रहिवाशी आहेत. आजच्या महामुकाबल्याबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, “भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा सर्वाधिक सक्षम आहे. आणि भारताचाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा आपलं नाव कोरेल.”  हसन यांना त्यांच्या भाचाबद्दल विचारलं असता, ते म्हणाले की, “तो आपल्या देशासाठी खेळ आहे, त्याबाबत मला आनंद आहे. आणि क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अतिशय चांगली आहे.”

सरफराजने आपल्या मामांची आजपर्यंत तीन वेळाच भेट घेतली असून, गेल्या वर्षी टी-20 सामन्यानिमित्त चंडीगढमध्ये पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी तो भारतात आला होता. त्यावेळी ही भेट झाली होती.