नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या महामुकाबल्यापूर्वी टीम इंडियाची झोप उडाल्याचं वृत्त आहे. कारण टीम इंडियाचं वास्तव्य ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे, त्या ग्रँड सिटी हॉटेलमध्ये काल रात्रभर वीजेचा लपंडाव सुरु होता. त्यामुळे एसी बंद असल्याने सर्व खेळाडूंची झोप पूर्ण झाली नसल्याचं समजतंय.
वास्तविक, सामन्यापूर्वी सर्व खेळाडू लवकर झोपी जातात. दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहलीनेच सर्व खेळाडूंना वेळेवर झोपण्याचा सल्ला दिला आहे. पण हॉटेलमधील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने, सर्व खेळाडू हॉटेलच्या टेरेसवर फिरताना दिसत होते.
दुसरीकडे काल लंडनचं तापमान 29 डिग्री होतं. तापमान वाढीमुळे हावेत उकाडाही चांगलाच जाणवत होता. त्यातच वीजेचा लपंडाव सुरु असल्याने, खेळाडू वेळेवर झोपू शकले नाहीत.
त्यामुळे खेळाडूंची झोप अपूर्ण होण्याचा परिणाम आजच्या सामन्यावर होणार का या प्रश्नाने क्रिकेटप्रेमींच्या चिंतेत भर टाकली आहे. पण दुसरीकडे हाच प्रकार पाकिस्तानी खेळाडूंच्या बाबतीतही घडल्याने, आजच्या सामन्यात याचा परिणाम कितपत जाणवेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.