नवी दिल्ली: भारतीय रेल्वे आता आपली तिकीट बुकींग रेल्वे सेवा आधारकार्ड डेटाबेसशी जोडणार आहे. त्यामुळे यापुढे आधारकार्डशिवाय रेल्वे तिकीट बुक करता येणार नाही. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी ही नवी योजना लागू करण्यात येत आहे.

 

ही योजना रेल्वे दोन टप्प्यात लागू करण्यात येणार आहे. या योजनेनुसार तिकीट बुकींग करताना आधारकार्डवरील देण्यात आलेला आधार क्रमांक तिकीटवर असणार आहे. तिकीट खिडकीवर अथवा ऑनलाइन तिकीट बुकींग करताना आधार क्रमांक देणं अनिवार्य असणार आहे. प्रवासादरम्यान, तिकीटावरील हा क्रमांक तिकीट निरिक्षक तपासतील. तसेच या क्रमांकांची मोबाइल डिव्हाइसमध्ये नोंद केली जाईल. त्यावरुन प्रवाशाची संपूर्ण माहिती मिळेल.

 

आधार कार्डमुळे अनेक योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसत असल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठी रेल्वेनं हे पाऊल उचलल्याचं समजतं आहे.