Mig 21 Squadron Retire From IAF : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातून मिग-21 विमान निवृत्त होणार आहेत. गुरुवारी हवाई दलाच्या मिग-21 विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन पायलट शहीद झाले. यानंतर पुन्हा एकदा मिग-21 विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने मिग-21 विमान हवाई दलातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 पर्यंत हवाई दलाच्या ताफ्यातून मिग-21 बाहेर पडणार आहेत. मिग-21 विमाने भारतीय हवाई दलाचा गेल्या अनेक वर्षांपासून मोठा भाग आहेत. पण, अलीकडच्या काळात मिग-21 विमानाच्या सुरक्षिततेबाबत अनेक अडचणी समोर आल्या आहेत.


2025 पर्यंत मिग-21 विमानं भारतीय हवाई दलातून निवृत्त


रतीय हवाई दलाच्या ताफ्यामध्ये 1960 पासून रशियन बनावटीच्या मिग-21 विमानांचा समावेशी आहे. मात्र मिग-21 विमानांच्या सुरक्षेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.  62 वर्षांच्या इतिहासात मिग 21 विमान अपघाताच्या 200 घटना घडल्या आहेत. एवढेच नाही तर गेल्या पाच वर्षांत भारतात विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात 42 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता हवाई दलाने मिग विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ताफ्यात असलेली चार मिग-21 विमानं 2025 पर्यंत भारतीय हवाई दलातून बाहेर पडतील.


मिग-21 विमान अपघातात सुमारे 200 जणांचा मृत्यू


वरूण गांधी यांनीही ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'बाडमेरमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे आणि दुःखी आहे! गेल्या काही वर्षांपासून मिग-21 हे विमान अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अनेक जण अपघातांचे बळी ठरत आहे. मिग विमान अपघातात आतापर्यंत जवळपास 200 वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. ही 'फ्लाइंग कॉफिन' आपल्या ताफ्यातून कधी हटणार?', असा प्रश्न वरुण गांधी यांनी उपस्थित केला आहे.


राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले, 2 पायलट शहीद


राजस्थानमध्ये 28 जुलै रोजी मोठी दुर्घटना घडली आहे. बाडमेरमध्ये मिग-21 विमान कोसळलं. हवाई दलाच्या मिग-21 मध्ये दोन पायलट होते. हा अपघात इतका भीषण होता की, मिग विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटर दूर पसरला होता. हा अपघात बारमेरच्या भीमडा गावात झाला. यामध्ये दोन पायलट शहीद झाले.