मुंबई : भारतीय हवाई दलाच्या एएन 32 विमानाचं काय झालं याचा पत्ता अद्यापही लागलेला नाही. विचित्र योगायोग म्हणजे बेपत्ता असलेल्या विमानाचे पायलट आहेत, आशिष तन्वर, त्यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोल रुममध्ये ड्यूटीवर होत्या त्यांच्या पत्नी संध्या तन्वर. म्हणजेच पत्नीच्या डोळ्यांदेखत बघता बघता पती गायब झाला.

आसामच्या जोरहाट तळावरुन 12 वाजून 25 मिनिटांनी एएन 32 या विमानाने उड्डाण घेतलं. या विमानाचे पायलट होते 29 वर्षांचे आशिष तन्वर. त्याचवेळी एअर ट्रॅफिक कंट्रोल रुममध्ये तैनात होत्या आशिष यांच्या पत्नी संध्या. 12 वाजून 59 मिनिटांपर्यंत आशिष आणि संध्या यांचा संपर्क होता, पण दुपारी 1 वाजता अचानक विमानाचा एटीसीबरोबर संपर्क तुटला. संध्या यांच्या डोळ्यादेखत पती चालवत असलेलं विमान रडारवरुन गायब झालं

2013 मध्ये आशिष तन्वर भारतीय हवाई दलात रुजू झाले. फेब्रुवारी 2018 मध्ये आशिष आणि संध्या यांचं लग्न झालं होतं. दोन मे रोजी संध्या आणि आशिष आपल्या घरी गेले होते. 18 मे रोजी ते फिरायला बँकाँकला गेले. त्यानंतर थेट आसामला आपल्या कामाच्या ठिकाणी ते रुजू झाले.

बेपत्ता झालेलं एएन 32 विमान एकदा इंधन भरल्यावर फक्त चार तासच उड्डाण करु शकतं. त्यामुळे विमानातील प्रवासी सुखरुप असण्याच्या शक्यताही दिवसेंदिवस मावळू लागल्या आहेत. मात्र आपल्या पतीचं विमान पुन्हा रडारवर दिसेल, ही संध्या यांच्या मनात तेवत असलेली आशा, खरी ठरावी, हीच प्रार्थना.