नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातला संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमित शाहांची भेट घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीआधी होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाध्यक्ष अमित शाहांशी चर्चा करणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने कुणाचा सहभाग करायचा याबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच रावसाहेब दानवेंच्या खासदारकीनंतर राज्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

या संभाव्य मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनीही दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. आज मुख्यमंत्री याबाबत चर्चा करुन संभाव्य नावांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या शुक्रवारी मुंबईत आणि नंतर दिल्लीतही यासंदर्भातल्या बैठका होणार आहेत.



विखेंना मंत्रिमंडळात स्थान?

काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील 11 किंवा 12 जूनला भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार का याबाबत मात्र अद्याप भाजपकडून सूचक मौन बाळगण्यात आलं आहे.