बालाकोटमध्ये वायुसेनेने टाकलेल्या पाचपैकी चार बॉम्ब्सचा दहशतवाद्यांच्या कॅम्पवर अचूक हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2019 05:06 PM (IST)
भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेला हवाई हल्ला परिणामकारक असल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेला हवाई हल्ला परिणामकारक असल्याचे समोर आले आहे. भारतीय वायु सेना बालाकोट हवाई हल्ल्यात इस्राईलमध्ये बनवलेल्या सहा 'स्पाईस 2000' या बॉम्ब्सचा वापर करणार होती. सहापैकी पाच बॉम्ब्सद्वारे बालाकोटवर हल्ला करकण्यात आला. त्यापैकी चार बॉम्ब अचूक निशाण्यावर जाऊन पडले. तर एक बॉम्ब जंगल परिसरात पडला, असा दावा वायुसेनेच्या नवी दिल्लीत झालेल्या एका बैठकीत करण्यात आला आहे. 11 ते 13 एप्रिल रोजी दिल्लीत झालेल्या वायुसेनेच्या बैठकीत हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या बालाकोट येथील एअर स्ट्राईकमुळे कोणतेही नुकसान झाले नाही, अशी बोंब मारणाऱ्या पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांचीदेखील उपस्थिती होती. एअरस्ट्राईकमध्ये 6 स्पाईस 2000 बॉम्ब्सपैकी 5 बॉम्ब भारताने बालाकोटवर टाकले. परंतु तांत्रिक अडचणींमुळे सहावा बॉम्ब फेकला गेला नसल्याची माहीती मिळाली आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा परिसरात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांच्या बसवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या भ्याड हल्लानंतर भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालाकोट परिसरात घुसून तिथल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला.