नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वाराणसीमधला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने यंदाही अजय राय यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघाचं तिकीट दिलं आहे. यामुळे पक्षाच्या सरचिटणीस आणि यूपी पूर्वच्या प्रभारी प्रियांका गांधी यांच्या वाराणसीमधून निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. परिणामी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियांका गांधी हा सामना रंगणार नाही.




मोदींविरोधात प्रियांका लढणार नाहीत
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होऊनही काँग्रेसने वाराणसीमधील उमेदवार जाहीर केलेला नव्हता. त्यामुळे या जागेवर प्रियांका गांधी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती. शिवाय प्रियांका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा तसंच राहुल गांधी यांनीही वाराणसीच्या उमेदवाराबाबत वारंवार सूचक वक्तव्य केली होती. त्यामुळे इथे प्रियांका गांधीच मोदींना आव्हान देतील, असं म्हटलं जात होतं. मात्र काँग्रेसने आज अजय राय यांना पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

VIDEO | काँग्रेस अध्यक्षांनी संधी दिल्यास वाराणसीतून लढण्यास तयार : प्रियंका गांधी


2014 मध्ये कोणाला किती मतं?
2014 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली होती. शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही इथून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु मोदींना विक्रमी 5 लाख 81 हजार 22 मतं मिळालीहोती. तर अरविंद केजरीवाल यांना 2 लाख 9 हजार 238 मतं आणि अजय राय यांच्या खात्यात केवळ 75 हजार 614 मतं जमा झाली होती. मोदी 3 लाख 71 हजार 784 मतांनी विजयी झाले होते.

VIDEO | प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार? रॉबर्ट वाड्रा म्हणतात...

संबंधित बातम्या

फैसला झालाय, थोडा सस्पेन्स ठेवतोय, प्रियांका गांधींच्या वाराणसीमधील उमेदवारीबाबत राहुल गांधींचं उत्तर

राहुल मला म्हणाले तर मी वाराणसीतून मोदींविरोधात निवडणूक लढेन : प्रियांका गांधी

वाराणसीतून निवडणूक का नको लढवू? प्रियांका गांधींचा कार्यकर्त्यांना सवाल

प्रियांका गांधी नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढणार?