नवी दिल्ली : राहुल गांधींकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा देण्याआधीच पक्षामध्ये त्यांच्याविरोधात आवाज उठू लागला आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षपदावरुन पूनावाला भावांडांचं नातं अडचणीत आलं आहे.


अध्यक्षपदाची मॅच फिक्स
महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. ते इलेक्टेड नव्हे तर सिलेक्टेड अध्यक्ष होणार आहेत. अध्यक्षपदाची मॅच आधीच फिक्स आहे, असा आरोप शहजाद यांनी केला. शिवाय पक्षात घराणेशाहीने मूळ धरल्याचंही त्यांनी म्हटलं.

तहसीन यांनी भाऊ शहजादसोबतचं नातं तोडलं
यानंतर तहसीन पूनावाला यांनी शहजाद यांच्यावर तोफ डागली. राहुल यांच्यावर केलेली टीका अत्यंत खेदजनक प्रकार आहे, त्यामुळे आपण व्यथित झाल्याचं तहसीन यांनी म्हटलं. शिवाय आजपासून आपण शहजादशी भाऊ म्हणून असलेलं नातं तोडत असल्याचंही त्यांनी ट्विटरवरुन जाहीर केलं. तहसीन पूनावाला काँग्रेसचे समर्थक असून ते रॉबर्ट वाड्रा यांचे मेहुणेही आहेत.

शहजाद यांना गांभिर्याने घेऊ नये : काँग्रेस
दुसरीकडे काँग्रेसने एक परिपत्रक जारी करुन म्हटलं आहे की, शहजाद पूनावाला मागच्या समितीत होते. यावेळी जी समिती स्थापना झाली आहे, त्यात ते नाहीत. इतकंच नाही तर यावेळी ते काँग्रेसचे सदस्यही बनलेले नाहीत. त्यामुळे जो काँग्रेसचा सदस्यच नाही त्याला मीडियाने गांभिर्याने घेऊ नये.