नवी दिल्ली : भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेण्डबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी उत्तर दिलं आहे. "पाकिस्तानातच नाही तर किमान 100 देशांमध्ये माझ्या मैत्रिणी आहेत," असं शशी थरुर म्हणाले. 'इंडिया टीव्ही'च्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी टीका करताना म्हटलं होतं की, "थरुर यांनी पाकिस्तानात जावं, कारण त्यांची गर्लफ्रेण्ड तिथे राहते." यावर शशी थरुर म्हणाले की, "किमान 100 देशांमध्ये माझ्या फ्रेण्ड्स आहेत, ज्या मुली आहेत. ज्या व्यक्तीने हे विधान केलं, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण ते कोणत्या प्रकारची निरर्थक बडबड करतात हे माहित नाही."
"थरुर यांना भारत सोडण्यासाठी दबाव टाकला जात नाही, तर केवळ हा सल्ला दिला जात आहे की त्यांनी पाकिस्तानात जावं, कारण त्यांची गर्लफ्रेण्ड तिथे राहते, त्यामुळे ते पाकिस्तानात जास्त आरामात राहू शकतात," असं सुब्रमण्यम स्वामी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
शशी थरुर बऱ्याच काळापासून भाजपच्या निशाण्यावर आहेत. हिंदू पाकिस्तानबाबतच्या विधानामुळे थरुर चर्चेत आले होते. "जर भाजप 2019 मध्ये पुन्हा सत्तेत आली तर भारत हिंदू पाकिस्तान बनेल. असं झाल्यास भाजप आपल्या मनमर्जीने संविधानात दुरुस्ती करु शकते, असं थरुर म्हणाले होते.