नवी दिल्ली : दिल्लीच्या रामजस कॉलेजमधील वाद वाढतच चालला आहे. शहीद जवानाच्या मुलीला बलात्काराची धमकी दिल्याच्या विरोधात डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. मात्र गुरमेहर कौरने या मोर्चात सहभाग घेण्यास नकार दिला आहे.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावरून कथितपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सदस्यांकडून बलात्काराच्या धमक्या येत असल्याची तक्रार गुरमेहर कौर हीने दिल्ली महिला आयोगाकडे केली होती. गुरमेहर कारगिल युद्धातील शहीद जवान मनदीप सिंह यांची मुलगी आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधील हिंसाचारानंतर गुरमेहरने त्याविरोधात आवाज उठवला होता. मात्र यानंतर आपल्याला अभाविपकडून बलात्काराची धमकी मिळाली, पण मी अभाविपला घाबरत नाही, असा फलक हाती घेतलेला फोटो गुरमेहरने सोशल मीडियावर टाकला होता.
गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यामुळे आपल्या वडिलांना पाकिस्तानने नाही, तर युद्धाने मारलं, असं वक्तव्य गुरमेहरने केलं होतं. या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाला.
वादात राहुल गांधींची उडी
गुरमेहर कौरला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला. त्यातच आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही गुरमेहरला पाठिंबा दिला आहे. भीती आणि छळाच्या विरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता, राग आणि अज्ञानतोविरोधात प्रत्येक ठिकाणी एक गुरमेहर उभी राहील, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.
सेहवागचं ट्विटरवॉर
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि अभिनेता रणदीप हुडा यांच्यात गुरमेहरवरुन ट्विटरवॉर रंगलं. ‘माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, युद्धाने मारलं’ असा फलक असलेल्या गुरमेहरच्या फोटोला प्रत्युत्तर म्हणून सेहवागने ‘दोन त्रिशतके मी नाही, माझ्या बॅटने केली,’ असा फोटो टाकला. त्याबद्दल अनेक ट्विटर युजर्सनी त्यावर टीका केली. मात्र रणदीप हुड्डाने सेहवागचे ट्विट उचलून धरत ‘तिला प्यादे बनवलं जात आहे’ अशी पोस्ट टाकली. त्यावर ‘मी सामना करत असलेल्या द्वेषाला तुम्ही उत्तेजन देत आहात.. प्यादे? मी स्वतः विचार करू शकते,’ असे ट्विट गुरमेहरने केलं.
https://twitter.com/virendersehwag/status/835856883655245824