नवी दिल्ली : ‘लेफ्ट’ भारतातील कोणत्याच भागासाठी ‘राईट’ नाहीत, असे म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी डाव्या पक्षांवर टीका केली. तसेच, पश्चिम बंगाल आणि केरळमधील जनताही डाव्यांच्या हिंसात्मक राजकारणाला कंटाळली आहे, असेही शाह म्हणाले.
ईशान्येकडील त्रिपुरा राज्यात भाजपने डाव्यांचा पराभव करत एकहाती सत्ता मिळवली. शिवाय नागालँडमध्येही भाजपने मोठी कामगिरी केली आहे. भाजपच्या या विजयानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन, डाव्यांसह काँग्रेसवर जोरदार टीका केली.
“त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तिन्ही राज्यांमधील जनतेचे आभार मानतो. मोदी सरकारच्या धोरणांना समजून घेतले आणि त्यांना साथ दिली. इथल्या जनतेने विकासाच्या अजेंड्याला सोबत दिली आहे.”, असे अमित शाह म्हणाले.
त्रिपुरात 2013 साली भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. मोदी सरकारने पूर्वेकडील राज्यांमध्ये विकास पोहोचवला आणि येथल्या जनतेनेही मोदी सरकारच्या धोरणांना साथ देण्यास सुरुवात केली, असे अमित शाह म्हणाले.
त्रिपुरात जनतेने बहुमत दिले असून, आम्ही सहकारी पक्षांनाही मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ, असे अमित शाह म्हणाले. तसेच, या विजयाचा पश्चिम बंगाल आणि केरळमधील भाजप कार्यकर्त्यांना अधिक आनंद झाला असेल, कारण तेथे डाव्यांच्या हिंसेचा सामना केला जात आहे, असेही ते म्हणाले.
मेघालयात बहुमत मिळालं नसलं, तरी तोडफोड करण्याचा प्रश्न येणार नाही. कारण भाजपचा सुवर्णयुग येणं अजून बाकी आहे, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सध्या इटलीमध्ये असणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही अमित शाह यांनी टोला लगावला. ते म्हणाले, राहुल गांधींना व्हॉट्सअपवर मेसेज आलाय की, इटलीत निवडणुका आहेत.