हैदराबाद : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी मंगळवारी हैदराबादमधील ग्लोबल एन्टरप्रिन्युअरशिप समिटमध्ये अर्थात जागतिक उद्योजक परिषदेत सहभाग नोंदवला. यावेळीत इव्हांका ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली. पंतप्रधानांनी इव्हांकासाठी खास जेवणाचं आयोजनही केलं होतं.
या कार्यक्रमात इव्हांका यांनी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. अनेकांनी इव्हांका यांच्या लूकचं कौतुक केलं. तर काहींनी हे कोणत्या प्रकारचे कपडे असल्याचं म्हटलं.
मंगळवारी रात्री दिलेल्या डिनरसाठी इव्हांका ट्रम्प यांनी प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर नीता लुल्लाने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये सोनेरी धागे आणि धार्मिक शहर वाराणसीमध्ये तयार होणाऱ्या रेशमाचा वापर करण्यात आला होता.
या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इव्हांका ट्रम्प यांना खास भेटही दिली. मोदींना इव्हांका यांना लाकडाचा एक बॉक्स भेट म्हणून दिला. या बॉक्सवर गुजरातमधील लोककलेचं पारंपरिक नक्षीकाम करण्यात आलं आहे. ह्या नक्षीकामाला सडेली क्राफ्ट नावानेही ओळखलं जातं. सूरतजवळच्या परिसरात ह्याचं काम केलं जातं.
संध्याकाळी जेईएसमध्ये सहभागी झाल्यानंतर फलकनुमा पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदींनी इव्हांका ट्रम्प यांच्यासाठी खास डिनरचं आयोजन केलं होतं. या डिनरमध्ये इव्हांका यांच्यासोबत ग्लोबल एन्टरप्रिन्युअरशिप समिटमध्ये आलेले 100 अतिमहत्त्वाचे पाहुणेही सहभागी झाले होते.
इव्हांका ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हैदराबादच्या ऐतिहासिक फलकनुमा पॅलेसमध्ये भारतीय पकवान्नांचा स्वाद घेतला. इव्हांका यांना भारताचे शाकाहारी पकवान्न वाढण्यात आले होते.
निजामाच्या काळात मोठ्या टेबल अर्थात मेजसाठी प्रसिद्ध असलेलं ताज फलकनुमा पॅलेसचं रुपांतर आता हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. या पॅलेसचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या मेजवर एकाच वेळी 101 पाहुणे जेवण करु शकतात. जगातील सर्वात मोठा डायनिंग टेबल आहे.
जेईएसमधल्या भाषणात इव्हांका ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार कौतुक केलं. चहावाला पंतप्रधान बनू शकतो म्हणजे बदल शक्य आहे, अशा शब्दात इव्हांका यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली.