हैदराबाद : हैदराबादमध्ये एका न्यूज अँकरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 36 वर्षीय राधिका रेड्डीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं.

'माझा मेंदू हा माझा शत्रू आहे' अशा आशयाची सुसाईड नोट पोलिसांना राधिकाच्या बॅगेत सापडली. पोलिसांनी केस दाखल केली असून तपास सुरु आहे. राधिका 'व्ही6' या तेलुगू वृत्तवाहिनीची निवेदिका होती.

राधिकाला नैराश्याने ग्रासल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ऑफिसहून परत आल्यावर राधिकाने थेट गच्ची गाठली आणि टोकाचं पाऊल उचललं. डोक्याला जबरदस्त मार बसल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

सहा महिन्यांपूर्वीच राधिकाचा घटस्फोट झाला होता. सध्या ती 14 वर्षांच्या मुलासोबत आई-वडिलांकडे राहत होती. राधिकाचा मुलगा मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे.