नवी दिल्ली : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे हरिद्वारमधील विद्यमान खासदार डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची कन्या डॉ. श्रेयशी निशंक यांची सैन्यदलात दाखल झाल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे.

डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन मुलीसोबतचा फोटो शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “तुम्हा सगळ्यांना सांगताना मला प्रचंड अभिमान वाटतो आहे की, माझी मुलगी डॉ. श्रेयशी निशंकने आज उत्तराखंडची सैन्य परंपरा कायम ठेवत, वैद्यकीय अधिकारी म्हणून दाखल झाली आहे.”


हिमालयन मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. श्रेयशी निशंक यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

“सध्याच्या घडीला स्त्रिया कुठल्याच क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत कमी नाहीत. त्यामुळे आपले कर्तव्य आहे की, मुलाच्या बरोबरीचे शिक्षण मुलीलाही आपण द्यायला हवे.”, असेही डॉ. पोखरियाल म्हणाले.

डॉ. रमेश पोखरियाल कोण आहेत?

भाजपचे नेते असलेले डॉ. रमेश पोखरियाल हे 2009 ते 2011 या कालावधीत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. ते सध्या हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. राजकारणापलिकडचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानही उल्लेखनीय आहे.