पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्यावर त्यांचे मुळ गाव सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र भगिरथ यांनी भारत भालके यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. भालकेना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरात जनसागर लोटला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.


आमदार भारत भालके यांचं रात्री 11.30 वाजतात पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. कोरोनावर मात करुन घरी आलेल्या भालके यांना पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा उपचारासाठी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारपासून त्यांची प्रकृती खालवली होती. अखेर त्यांचे निधन झाले.


आज सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अंतिम दर्शनासाठी ठेवले होते. त्यानंतर त्यांचा पार्थिव पंढरपूर, मंगळवेढ्यातील लोकांना दर्शनास नेण्यात आले. दुपारी सरकोली येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनास ठेवले होते. संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार यशवंत माने, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिपक साळुंखे तसेच स्थानिक पदाधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली.


आमदार भारत भालके हे महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना सोडून गेले. भारत भालके हे जनेतचा नेते होते. तीन निवडणुकीत वेगळा पक्ष वेगळे चिन्ह असूनही भालके यांनी विजय मिळवला. जनतेची कामं घेऊनच ते सतत भेटायचे. भालके यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार. भालके यांच्या कुटुंबाच्या दुःखात सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दांत अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.