श्रीनगर: आजच्या आधुनिक युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहेत. अनेक महिला आज नोकरी करुन स्वयंपूर्ण होत आहेत. मात्र, पण हीच गोष्ट काश्मीरमधील एका व्यक्तीला आपल्या पत्नीबाबत खटकत होती आणि त्यानं असं काही केलं की, ज्यावर आपला विश्वासही बसणार नाही.

काश्मीरचे आयएएस अधिकारी शाह फैजल यांना काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याचा राजीनामा मिळाला. राजीनामा पाहून फैजल यांनाही आश्चर्य वाटलं. कारण की, नोकरी सोडण्याचं कोणतंही ठोस कारण त्या पत्रात देण्यात आलं नव्हतं.

काही दिवसांनंतर त्याच महिलेनं याबाबत खुलासा केला की, राजीनाम्याचं ते पत्र आपण नाही तर आपल्या पतीनं लिहलं होतं. कारण की, आपल्या पत्नीनं नोकरी करावी हे त्याला मान्य नव्हतं. त्यासाठीच तिच्या पतीनं तिच्या नावे खोटं राजीनामा पत्र लिहून तिच्या कार्यालयात पाठवून दिलं.



या संपूर्ण प्रकरणानं फैजल यांना धक्काच बसला आणि त्यांनी याबाबत एक फेसबूक पोस्ट लिहून हे प्रकरण जगासमोर आणलं. त्यांनी लिहलं की, 'अचानक ती महिला माझ्या कार्यालयात आली आणि रडूच लागली. त्यानंतर तिनं सांगितलं की, ते पत्र मी लिहलेलं नाही. तर माझ्या पतीनं लिहलं आहे.'

'महिला म्हणाली की, तिचा पती नोकरी करत नाही. त्यामुळे मी देखील नोकरी करु नये असं त्याला वाटतं. पण मला माझ्या मुलांसाठी कमवायचं आहे.' असं फैज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आयएएस अधिकारी फैज यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहलं  आहे की, ही घटना फारच लज्जास्पद आहे. यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे.