नवी दिल्ली : पत्नीचं परपुरुषांसोबत अश्लील व्हॉट्सअॅप चॅट वाचून पतीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करत पतीने काडीमोड देण्याची मागणी हायकोर्टाकडे केली आहे. दिल्लीत हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
तरुणाने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात क्रूरतेचा आरोप केला आहे. तरुणाच्या याचिकेनंतर जज ए. के. सरपाल यांनी याचिकाकर्त्याच्या पत्नीला नोटीस पाठवली. मात्र कोर्टात हजेरी लावल्यानंतर महिलेने सर्व आरोप फेटाळले आहेत.
पती भागीरथी विहारचा रहिवासी आहे, तर पत्नीचं माहेर शाहदरात आहे. गेल्या वर्षी सात मे रोजी हुंडा न घेता, कुठलाही दिखाऊपणा न करता आपण विवाहबंधनात अडकल्याचं पतीनं सांगितलं.
लग्नानंतर आपले संबंध फारसे चांगले नव्हते. पत्नी आपल्याला जवळही येऊ देत नव्हती. इतकंच नाही, तर ती संपूर्ण पगार काढून घेते आणि कुटुंबीयांवर एक पैसाही खर्च करु देत नाही. शारीरिक संबंध ठेवण्यासही पत्नी नकार देते. मात्र रात्र-रात्रभर व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत असते, असा आरोप पतीने याचिकेत केला आहे.
एक दिवस मी चोरुन तिचं व्हॉट्सअॅप चॅट वाचलं. ती अनेक तरुणांसोबत अश्लील आणि घाणेरडं चॅटिंग करते. अश्लील फोटो आणि व्हिडिओही शेअर करते, असं तरुणाचं म्हणणं आहे. त्याने यासंबंधी एक हार्ड डिस्क कोर्टाकडे सुपूर्द केली आहे.
आपण पत्नीशी तिच्या पालकांच्या उपस्थितीतच चर्चा केली. मात्र तिच्या आई-वडिलांनी ते तरुण म्हणजे तिचे जुने मित्र असल्याचं सांगत जुन्या गोष्टी विसरुन जाण्यास सांगितलं. मी विरोध करताच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली, असाही दावा त्याने केला आहे.