नवी दिल्ली: तिहेरी तलाकबाबात बोलताना काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी प्रभू रामाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, आता त्यांनी सारवासारव केली आहे. रामाने सीतेला तलाक दिला असं म्हणालो नाही, तर सीता मैयाचीसुद्धा अग्निपरीक्षा घेतली गेली, असं म्हणाल्याचं, खासदार हुसेन दलवाई म्हणाले.
संशयातून प्रभू रामानेही सीतेला काही काळासाठी सोडलं होतं, असं वक्तव्य हुसेन दलवाई यांनी तिहेरी तलाक संदर्भात बोलताना केलं होतं. त्यावरुन हुसेन दलवाई यांच्यावर टीका झाली.
याबाबत हुसेन दलवाईंशी संपर्क साधला असता, ते म्हणाले “रामाने सीतेला तलाक दिला असं म्हणालो नाही, तर सीता मैयाची सुद्धा अग्निपरीक्षा घेतली गेली. महिलांना इतिहास काळापासूनच दुय्यम स्थान आहे असे मी म्हणालो. पण यामुळं कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागतो”.
प्रभू रामाबद्दल अनादर दाखवण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वक्तव्याचं मुद्दाम राजकारण केले जातंय. महिलांची त्यांच्या हक्कांसाठीची लढाई सुरू आहे, मी त्याचाच एक भाग आहे. केवळ मुस्लिम महिलांवरच नव्हे तर सर्व महिलांवर अन्याय होतोय. एवढाच कळवळा असेल तर मग संसदेत महिला आरक्षणाचे बिल का आणत नाही.माझा तिहेरी तलाक पद्धतीला विरोधच आहे. फक्त त्यात जो गुन्हेगारीचा मुद्दा आणला जात होता तो चुकीचा आहे, असं हुसेन दलवाई म्हणाले.
भाजपा आता मुस्लिम महिलांच्या हक्काबद्दल बोलतेय, तर ते आता आश्वासन देतील का की यापुढे कुठल्याही दंग्यांमध्ये मुस्लिम महिलांवर बलात्कार, अत्याचार होणार नाहीत? गुजरातमध्ये काय झालं होतं? असे प्रश्न दलवाईंनी विचारले.
इस्लाममध्ये महिलांना प्रॉपर्टी बद्दलचे हक्क दिले गेलेत. तिहेरी तलाक इस्लाममध्ये नाहीच. पाकिस्तानवालेसुद्धा सांगतात ये सिर्फ आपके यहाँ है. जिने पहिला इस्लाम स्वीकारला ती महिला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. या विधेयकामुळे मुस्लिम कायद्यामध्ये काही ढवळाढवळ होते असं मी बिलकुल मानत नाही. त्यामुळे सबलीकरणासाठी पाठिंबाच दिला पाहिजे असे पक्षाला सुचवेन, असं हुसेन दलवाई म्हणाले.
रामानेही सीतेला सोडलं होतं, दलवाईंच्या वक्तव्याने वाद, टीकेनंतर माफी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2018 03:43 PM (IST)
संशयातून प्रभू रामानेही सीतेला काही काळासाठी सोडलं होतं, असं वक्तव्य हुसेन दलवाई यांनी तिहेरी तलाक संदर्भात बोलताना केलं होतं. त्यावरुन हुसेन दलवाई यांच्यावर टीका झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -