विद्यापीठं, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी यासारख्या विविध वर्गात ही रॅकिंग जाहीर करण्यात आलीय. सगळ्यात विशेष म्हणजे यावर्षी या रँकिंगमध्ये पहिल्यांदाच सर्वसाधारण महाविद्यालयांचा समावेश करण्यात आलेला होता.
देशातल्या शंभर टॉप कॉलेजेसची यादी केंद्र सरकारनं जाहीर केलीय. विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ दहाव्या क्रमाकांवर, इंजिनियरिंगमध्ये आयआयटी बॉम्बे, शिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या महाराष्ट्रातल्या काही संस्थानी आपला नावलौकिक ठेवला असला, तरी सर्वसाधारण महाविद्यालयांच्या कामगिरीत मात्र महाराष्ट्र मागे पडलेला आहे.
ज्या पुण्याला आपण मराठी लोक विद्येचं माहेरघर म्हणतो, त्या पुण्यातली कॉलेजेसही या यादीत फारसी छाप पाडू शकलेली नाहीयेत. या कॉलेजेसच्या या यादीत महाराष्ट्रातलं पहिलं नाव हे 30 व्या क्रमांकावर सापडतं.
पुण्यातल्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी या महाविद्यालयानं हा क्रमांक पटकावलाय. तर 35 व्या क्रमाकांवर पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज आहे. त्यानंतर पाठोपाठ 36 वा क्रमांक आहे अमरावतीच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशननं. तर मुंबईत ज्या कॉलेजचं नाव एरवी सगळ्यांच्या तोंडावर असतं ते झेवियर्स कॉलेज 40 स्थानावर आहे.
मुंबई-पुण्याबाहेरचे कॉलेज पहिल्या शंभरात !
विशेष म्हणजे मुंबई-पुण्याबाहेरच्या काही कॉलेजसनं मात्र आश्चर्यकारकरीत्या किमान देशातल्या शंभरात स्थान मिळवलंय. त्यात कोल्हापुरातलं विवेकानंद कॉलेज हे 58 व्या स्थानावर, नांदेड एज्युकेशन सोसायटीज सायन्स कॉलेज हे 72 व्या स्थानावर, उस्मानाबाद जिल्ह्यातलं साई कॉलेज ऑफ कंप्युटर एज्युकेशन हे 83 व्या स्थानावर तर वर्ध्यातलं जानकीदेवी बजाज कॉलेज ऑफ सायन्स हे 88 व्या स्थानावर आहे.
काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठाचं सांगलीतलं मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय हे देशात 99 व्या स्थानावर आहे. तर पुण्यातल्या नामांकित सिम्बॉयसिसचा या यादीतला क्रमांक 81 इतका आहे.
दिल्लीचा दबदबा!
विद्यापीठं, इंजियनरिंग, मॅनेजमेंट इन्स्टिट्युटचं रॅकिंग मागच्या वर्षीही काढलं गेलं होतं. शिवाय त्यात अनेक अपेक्षित संस्थांनीच, म्हणजे ज्यांना केंद्रीय निधी मिळतो त्यांनीच नंबर पटकावलेत. पण अशा प्रकारे महाविद्यालयीन रॅकिंग मात्र पहिल्यांदाच काढलं गेलंय. त्यामुळे या यादीची चर्चा जास्त होतेय. या यादीत दबदबा आहे तो मात्र राजधानी दिल्लीचा.
पहिल्या 10 मध्ये दिल्लीतली बहुतांश कॉलेजेस आहेत. तर संख्याबळानुसार तामिळनाडू या दक्षिणेतल्या राज्याची कॉलेजस सर्वाधिक टॉपवर आहेत.
देशातली टॉप टेन कॉलेजची यादी पुढीलप्रमाणे :
- मिरांडा हाऊस, दिल्ली
- लोयोला कॉलेज, चेन्नई, तामिळनाडू
- श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, नवी दिल्ली
- बिशॉप हेबेर कॉलेज, तिरुचिरापल्ली, तामिळनाडू
- आत्मा राम सनातन धर्म कॉलेज, नवी दिल्ली
- सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकाता, पश्चिम बंगाल
- लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेन्स, नवी दिल्ली
- दयाल सिंह कॉलेज, दिल्ली
- दिनदयाल उपाध्याय कॉलेज, नवी दिल्ली
- दि वुमेन्स ख्रिश्चन कॉलेज, चेन्नई, तामिळनाडू
महाराष्ट्रातली कॉलेज कुठल्या स्थानावर :
- राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बाय टेक्नॉलॉजी, पुणे (क्रमांक – 30)
- फर्ग्युसन, पुणे (क्रमांक – 35)
- डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती (क्रमांक – 36)
- सेंट झेवियर्स, मुंबई (क्रमांक – 40)
- विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (क्रमांक – 58)
- नांदेड एज्युकेशन सोसायटीज सायन्स कॉलेज (क्रमांक – 72)
- सिम्बॉयसिस, पुणे (क्रमांक – 81)
- साई कॉलेज ऑफ कंप्युटर एज्युकेशन, जिल्हा उस्मानाबाद (क्रमांक – 83)
- जानकीदेवी बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धा (क्रमांक – 88)
- भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, जिल्हा सांगली (क्रमांक – 91)