Indias Missile Firing: भारतीय हद्दीतून अलीकडेच चुकून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याची घटना घडली होती. भारताने या दुर्घटनेबद्दल मनापासून खेद व्यक्त केला असून, नियमित देखभाल करताना तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र भारताने डागल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला होता.


याबाबतच माहिती देताना आज राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत की, ''9 मार्च 2022 रोजी घडलेल्या एका घटनेबद्दल मला सभागृहाला अवगत करून द्यायचे आहे. ही घटना तपासणीदरम्यान अनावधानाने क्षेपणास्त्र सोडण्याशी संबंधित आहे. क्षेपणास्त्र युनिटची नियमित देखभाल आणि तपासणी सुरू असताना सायंकाळी सातच्या सुमारास अपघाताने क्षेपणास्त्र सोडण्यात आले. नंतर हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची माहिती मिळाली. ही घटना खेदजनक आहे. मात्र या अपघातात कोणतीही हानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.'' 


ते म्हणाले आहेत की, ''मला सभागृहाला कळवायचे आहे की, सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताचे नेमके कारण काय होते, हे तपासानंतर कळेल. मी हे देखील सांगू इच्छितो की, या घटनेच्या संदर्भात ऑपरेशन, देखभाल आणि तपासणीसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रियांचा आढावा घेतला जात आहे. आम्ही आमच्या शस्त्र यंत्रणेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो. यासंदर्भात काही त्रुटी आढळून आल्यास तत्काळ दुरुस्त करण्यात येईल.''


आपल्या वक्तव्यादरम्यान ते म्हणाले की, ''मी सभागृहाला खात्रीने सांगतो की, आपली क्षेपणास्त्र प्रणाली अतिशय सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. याव्यतिरिक्त, आपली सुरक्षा प्रक्रिया आणि प्रोटोकॉल उच्च दर्जाचे आहेत आणि वेळोवेळी याची तपासणी केली जाते. आपले सुरक्षा दल प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध आहेत आणि त्यांना अशा यंत्रणा हाताळण्याचा चांगला अनुभव आहे.''


भारताकडून पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र डागणे हा अपघात - अमेरिका


अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भारताकडून क्षेपणास्त्र डागणे हा केवळ एक अपघात होता. प्राइस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, भारतीय संरक्षण मंत्रालयाने 9 मार्च रोजी एक निवेदन जारी करून काय घडले हे स्पष्ट केले होते. आम्ही यावर अधिक भाष्य करू शकत नाही.

संबंधित बातम्या: