नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दिल्लीतील पत्ता बदलला आहेत. अमित शाह यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारी निवासस्थानात अधिकृतपणे गृहप्रवेश केला.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर दिल्लीतील कृष्णमेनन मार्गावरचा हा बंगला रिकामा होता. वाजपेयींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी हा सरकारी बंगला आणि माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांसाठी असलेली एसपीजी सुरक्षा सरकारला परत केली होती.
अमित शाह यांचा पत्ता बदलला
अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरच हा बंगला त्यांना मिळणार अशी चर्चा सुरु झाली होती. 2014 ला दिल्लीत आल्यापासून आतापर्यंत 11, अकबर रोड हा अमित शाह यांचा पत्ता होता. तो बदलून आता 6 ए कृष्णमेनन मार्ग असा होईल.
अटल बिहारी वाजपेयींचं 14 वर्ष या बंगल्यात वास्तव्य
अटल बिहारी वाजपेयी 2004 ला पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर या सरकारी निवासस्थानात स्थलांतरित झाले होते. आयुष्याची शेवटची 14 वर्षे त्यांनी याच बंगल्यामध्ये व्यतीत केली. त्यामुळे हा बंगला कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. मोदी मंत्रिमंडळातील नंबर दोन कोण याची चर्चा आता बंद झाली असली, तरी अमित शाह यांचे वजन यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. लालकृष्ण अडवाणींकडे कधीकाळी असलेले गृहमंत्रीपद आणि वाजपेयी यांचे निवासस्थान या दोन्ही गोष्टी सध्या अमित शाह यांच्याकडे आहेत.
VIDEO | आरबीआयच्या टॉनिकने अर्थव्यवस्था बरी होणार का? | माझा विशेष