भारत-बांगलादेश सीमेवर रंगोत्सव, पाकिस्तानातही होळी साजरी
एबीपी माझा वेब टीम | 13 Mar 2017 10:29 AM (IST)
कराची : देशभरात होळी आणि धुळवडीचा सण उत्साहात साजरा होत असताना सीमेपलिकडे अर्थात पाकिस्तानातही मोठ्या उत्साहानं होळी साजरी झाली. कराचीत असलेल्या स्वामीनारायण मंदिराच्या परिसरात हा सण साजरा झाला. पाकिस्तानात असलेल्या हिंदू नागरिकांसोबतच मुस्लिम बांधवांनीही रंगोत्सवात सहभाग घेतला. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येत रंगांची उधळण केली. भारत-बांगलादेशच्या सीमेवर होळीचा सण साजरा करण्यात आला. अगरातळा-अखवारा चेक पोस्टवर भारतीय जवान आणि बांगलादेशच्या जवानांनी एकमेकांना मिठाई वाटत होळीच्या शुभेच्छा दिल्या. सीमाभागात सहकार्य वाढवण्यासाठी होळीचा सण महत्वाचा असल्याची भावना दोन्ही देशांच्या सैनिकांनी व्यक्त केली. जम्मू काश्मीरमध्ये बीएसएफचे जवानही रंगात रंगलेले पहायला मिळाले. पूँछमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. एकमेकांना रंग लावून होळीचा उत्साह द्विगुणीत करण्याचा प्रयत्न जवानांनी केला. यावेळी जवानांनी भारतीय नागरिकांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या.