पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची झेड प्लस सुरक्षा हटवण्यावरुन बिहारच्या राजकारणात नवं वादळ आलं आहे. लालूप्रसाद यादव यांच्या संतापलेल्या मोठ्या मुलाने थेट पंतप्रधानांविषयीच अनुद्गार काढले आहेत.


तेजप्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कातडी सोलून काढू, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. लालूंच्या हत्येचा कट रचला जात असून या कटामुळे त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आरोप तेजप्रताप यांनी केला आहे.

लालू प्रसाद यांची झेड प्लस सुरक्षा काढून झेड दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे. काही अघटीत घडल्यास त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असतील, असंही तेजप्रताप म्हणाले. लालूंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराही तेजप्रताप यांनी यावेळी दिला.

विशेष म्हणजे, जीभ घसरलेल्या तेजप्रतापची लालू प्रसाद यादव यांनी कानउघडणी केली आहे. मुलाला समजावलं असून यापुढे असं वक्तव्य न करण्याचा सल्ला दिल्याचं लालू म्हणाले.