श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये झालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेचा कमांडर यासीन इट्टूचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.


शोपियामध्ये शुक्रवारी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या तिघांमध्ये यासीन इट्टूचा समावेश होता.

शोपियाच्या अवनीरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू पोलिस, सीआरपीएफ आणि 55 राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत परिसराला वेढा दिला. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या चकमकीत भारतीय जवानांनी यासीन इट्टूला कंठस्नान घातलं.

काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी बुरहान वाणी, अबू दुजाना यांच्यानंतर यासीन इट्टू हा प्रमुख दहशतवादी होता. भारतीय सैन्याने जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत यासीन इट्टूचा A प्लस कॅटेगिरीतही समावेश होता. यासीन इट्टू हा बुरहान वाणीचा जवळचा मानला जायचा. त्यामुळे त्याचा खात्मा भारतीय जवानांसाठी मोठ यश मानलं जातं आहे.

दरम्यान, या चकमकीत महाराष्ट्रातील एका जवानासह दोन जवान शहीद झाले आहेत. अकोल्यातील सुमेध गवई आणि इलयाराजा यांना वीरमरण आलं.

संबंधित बातमी

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!