Himachal Pradesh Election Result 2022 : गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे (Himachal Pradesh Election) कल आता हाती येत आहेत. गुजरातमध्ये भाजप (BJP) आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये आता काँग्रेसनं (Congress) आघाडी घेतली आहे. सुरुवातीला हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, सातत्यानं हिमाचलमधील कल बदलत आहेत. सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. त्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे.    


Himachal Pradesh Congress : काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर


सध्या सातत्यानं विधानसभा निवडणुकांचे आकडे बदलत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. तर तीन जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. त्या ठिकाणी बहुमताचा आकडा 35 चा आहे. सध्या विचार केला तर काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला आहे. मात्र, अद्याप संपूर्ण निकाल हाती आलेला नाही. काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं हिमाचलमध्ये भाजपला धक्का देत काँग्रेस सत्तेचा सोपान पार करणार का? काही वेळातच स्पष्ट होणार आहे. 


हिमाचलमधील 68 केंद्रांवर मतमोजणी सुरु


हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी सुरु आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत 68 जागांसाठी एकूण 412 उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचलच्या 68 सदस्यीय विधानसभेसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. सुमारे 76.44 टक्के मतदारांनी मतदान केले होते. 


हिमाचल प्रदेशमधील 'या' जागांवर प्रतिष्ठेची लढाई


1. सिराज 


हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सहाव्यांदा सिराज मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर या मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री जयराम यांची पुन्हा काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांच्याशी लढत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांचा 11,254 मतांच्या फरकाने पराभव केला होता.


2. शिमला 


हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे शिमला ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.  मागील निवडणुकीत विक्रमादित्य सिंह विजयी झाले. तर, भाजपने येरवी मेहता यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास विक्रमादित्य सिंह हे मुख्यमंत्री होऊ शकतात. 


3. हरोली 


काँग्रेसचे नेते मुकेश अग्निहोत्री हे सध्या हिमाचल प्रदेशमधील हरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत ते विजयाची हॅट्रिक साधणार का, हे पाहावे लागणार आहे. 


4. थिओग 


थिओग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) राकेश सिंघा आहेत. यावेळी त्यांना काँग्रेस आणि भाजपच नव्हे तर आम आदमी पक्षाचेही  आव्हान आहे. या मतदारसंघात सीपीआयएम, भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे.  


5. डलहौसी 


हिमाचल प्रदेशातील डलहौसी विधानसभा जागेवर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. डलहौसी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आशा कुमारी या सहा वेळा आमदार झाल्या आहेत. आशा कुमारी या छत्तीसगड सरकारचे आरोग्य मंत्री टीएस सिंह यांची बहीण आहे. यावेळी त्यांना भाजपचे डीएस ठाकूर यांचे आव्हान आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आशा कुमारी यांना 24 हजार 224 म्हणजेच 48.77 टक्के मते मिळाली होती.


6. फतेहपूर 


2017 च्या निवडणुकीत भाजपने कृपाल परमार यांना तिकीट दिले होते, परंतु त्यानंतर ते काँग्रेसचे माजी मंत्री सुजानसिंग पठानिया यांच्याकडून पराभूत झाले. यावेळी काँग्रेस पक्षाने दिवंगत काँग्रेस नेते सुजानसिंग पठानिया यांचे पुत्र भवानी सिंग पठानिया यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने राकेश पठानिया यांच्यावर विश्वास दाखवला आहे. 2012 मध्ये काँग्रेसच्या सुजान सिंह यांनी भाजपच्या बलदेव ठाकूर यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भवानी सिंह पठानिया यांनी ही जागा जिंकली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


Himachal Election Results 2022: हिमाचलमध्ये काँग्रेसला 'ऑपरेशन लोटस'ची भीती, आमदारांना राजस्थानच्या रिसॉर्टमध्ये हलवणार?