Rupee Vs Dollar: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाची घसरण सुरू (Rupee Vs Dollar) आहे. आज व्यवहार सुरू झाल्यानंतर  रुपयाने आतापर्यंतचा नीचांकी दर (Rupee Hit All time Low) गाठला. रुपयात होत सातत्याने घसरण होत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी रुपया 80.90 रुपये प्रति डॉलरवर खुला झाला होता. त्यानंतर आज 62 पैशांची घसरण दिसून आली. आज बाजार सुरू झाल्यानंतर रुपया 81.52 रुपयांवर खुला झाला. 


आज बाजारातील व्यवहाराची सुरूवात घसरणीसह झाली आणि डॉलरच्या तुलनेत रुपया 81.55 या दरापर्यंत घसरला होता. जागतिक बाजारात डॉलर अधिक मजबूत होतच असल्याचा परिणाम रुपयांवरही दिसून येत आहे.


भारताच्या चिंतेत वाढ


डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कायम राहिल्यास भारताचा आयात खर्च आणखी वाढण्याची भीती आहे. इंधन दरावर याचा परिणाम होण्याची भीती असून महागाईचा भडका उडू शकतो. 


गुंतवणूकदारांच्या माघारीचा परिणाम?


आशियाई बाजारातून परदेशी गुंतवणूकदार माघार घेत असल्याने त्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर होत असल्याचे चित्र आहे.. आशियाई बाजारावर दबाव वाढत आहे. डॉलर आणखी मजबूत होत असल्याने  येन आणि युआन या चलनात ही घसरण दिसत आहे. 


चीन आणि जपानच्या बाजारावर अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीचा परिणाम झाला आहे. डॉलरची खरेदी वाढल्याने येन आणि युआनमध्ये घसरण दिसून येत आहे. 


डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत कशी ठरते?


कोणत्या देशाच्या चलनाचे मूल्य हे अर्थशास्त्रातील मूलभूत सिद्धांत, मागणी आणि पुरवठा यावर आधारीत असते. फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये ज्या चलनाला अधिक मागणी असते त्याची किंमत अधिक असते. ज्या चलनाची मागणी कमी असते त्याची किंमतदेखील कमी असते. 


चलन मूल्य ठरवण्यासाठी Pegged Exchange Rate ही देखील एक पद्धत असते. Pegged Exchange Rate म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज दर असतो. यामध्ये एक देश दुसऱ्या देशाच्या तुलनेत आपल्या चलनाचे मूल्य निश्चित करतो. व्यापार वाढवण्यासाठी आणि महागाई वाढवण्यासाठी हा पर्याय वापरला जातो. 


डॉलर आणखी वधारणार?


अमेरिकेतील वाढती महागाई रोखण्यासाठी फेडरल रिझर्व्हने 75 बीपीएसची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमेरिकेतील व्याज दरात 0.75 टक्क्यांची वाढ झाली. फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याज दरात वाढ केली आहे. आगामी बैठकांमध्येही व्याज दरात वाढ करण्याचे संकेत फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. वर्ष 2023 पर्यंत व्याज दर हा 4.6 टक्क्यांपर्यंत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक चलनबाजारात डॉलर आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.