Coronavirus Cases Today in India : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख घसरताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 129 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर रविवारी दिवसभरात 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 2.51 टक्के आहे. आधीच्या दिवशी म्हणजे शनिवारी दिवसभरात 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. म्हणजे एका दिवसात 648 रुग्णांची घट झाली आहे. ही दिलासादायक बातमी आहे. कारण कोरोनाच्या कमी होणाऱ्या प्रादुर्भावामुळे सणांवरचे निर्बंध हटले आहेत. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधातून मुक्त होत उत्साहात सण साजरे केले जात आहेत.


आठवड्याभरातील कोरोनाची आकडेवारी


26 सप्टेंबर 2022 - 4129
25 सप्टेंबर 2022 - 4777
24 सप्टेंबर 2022 - 4912
23 सप्टेंबर 2022 - 5383
22 सप्टेंबर 2022 - 5443
21 सप्टेंबर 2022 - 4510
20 सप्टेंबर 2022 - 4043


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 43 हजार 415


देशात सध्या 43 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहेत. देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत. देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 688 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 217 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 11 लाख 67 हजार 772 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.


देशात आतापर्यंत 5 लाख 28 हजार 530 कोरोनाबळी


देशात गेल्या 24 तासांत 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल 23 रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत देशात एकूण 5 लाख 28 हजार 530 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना दैनंदिन सकारात्मकता दर (Positivity Rate) 2.51 टक्के आहे.  


महाराष्ट्रात रविवारी दोन बाधितांचा मृत्यू


कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असले तरी सक्रिय रूग्णांच्या संख्येत मात्र रोज घट होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या  3,702 सक्रिय रूग्ण आहेत. विवारी महाराष्ट्रात 541 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दोन-तीन आठवड्यापासून रूग्ण संख्येत चढ-उतार होत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घटत चाललेली रूग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. याबरोबरच कोरोनाने अद्याप देखील मृत्यू होत आहेत. रविवारी दिवसभरात महाराष्ट्रात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे राज्यात नव्या कोरोना रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर राज्यात 546 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.