मुंबई : येत्या काळात तुम्हाला चक्क महामार्गांवरुन विमानं धावताना दिसली तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण लवकरच देशभरातल्या 22 महामार्गांवरुन सैनिकी विमानं उड्डाण घेणार आहेत.
देशातील युद्ध परिस्थितीचा विचार करुन भारत सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात युद्धस्थिती निर्माण झाल्यास अवघ्या काही मिनिटात देशातल्या हायवेंचं रुपांतर हे रनवेमध्ये होईल.
काही महिन्यांपूर्वी नोएडातल्या महामार्गांवर यशस्वीपणे विमान उड्डाणाचा प्रयोग केला गेला होता. सध्या तरी या योजनेत उत्तर प्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या चार राज्यांचा समावेश केला गेला आहे.
याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यात बैठकही होणार आहे. पाकिस्ताननं जर सीमेपलीकडून कुरघोड्या चालूच ठेवल्या, तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतानं हे पाऊल उचललं आहे.