नवी दिल्ली : शस्त्रसंधीचं उल्लंघन करत शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने तयारी सुरु केली आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

बैठकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री अरूण जेटली, रविशंकर प्रसाद आणि जितेंद्र सिंह यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. त्यासंदर्भात चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी उद्या संरक्षण समितीची बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती आहे. त्या बैठकीतल्या चर्चेचा मसुदा तयार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

दरम्यान शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या पाक लष्कराला भारतीय लष्कराच्या डीजीएमओने चांगलच खडसावलं. भारतीय लष्कराचे डीजीएमओ भट्ट यांनी पाकिस्तानच्या संबंधित लष्करी अधिकाऱ्यांशी हॉट लाईनवर संपर्क करुन शहिदांच्या विटंबनेसंदर्भात खडेबोल सुनावले.

ज्या तळावरून पाकिस्तानने हल्ला केला, ते तळ भारतीय लष्कराने उद्धवस्त केलेत. या हल्ल्यात पाकिस्तानचे काही रेंजर्स मारले गेल्याचीही माहिती आहे.