Air Strike: देशभरात हाय अलर्ट, मुंबई-अहमदाबादसह प्रमुख शहरांत वाहनांची तपासणी
एबीपी माझा वेब टीम | 27 Feb 2019 10:33 AM (IST)
भारतीय वायु सेनेने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताची पश्चिमी नौसेना हाय अलर्टवर आहे.
मुंबई : भारतीय वायु सेनेने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताची पश्चिमी नौसेना हाय अलर्टवर आहे. तसेच देशभरातील मुंबई-अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरांमधील पोलीस सतर्क झाले आहेत. अनेक शहरांमध्ये संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. मुंबई पोलीस, अहमदाबाद पोलीस हाय अलर्टवर आहेत. दोन्ही शहरांमधील पोलीस महामार्गांवर धावणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी करत आहेत. दरम्यान भारतीय नौसेना हाय अलर्टवर असून कोणत्याही देशविरोधी कारवाईला सामोरी जाण्यास तयार आहे. दरम्यान, भारताने काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मंगळवारी बदला घेतला. भारतीय हवाई दलाने पाकच्या हद्दीत घुसून 350 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान बावचळला आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानी जवान एलओसीवरील रहिवासी परिसरात लपून भारतावर ग्रेनेड हल्ले करत आहेत. पाकिस्तानच्या ग्रेनेड हल्ल्यात भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यांना भारतानेदेखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे काही रेंजर्स ठार झाले आहेत.