नवी दिल्ली : पोलिसांनी दिल्लीत दोन दहशतवादी घुसल्याची भीती व्यक्त केली आहे. या संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रेदेखील पोलिसांनी  प्रसिद्ध केली आहेत. हे दोन्ही संशयित दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काल पंजाबच्या अमृतसरमध्ये निरंकारी भवनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या अगोदरपासून पंजाबमार्गे दिल्लीत दहशतवादी घुसणार असल्याची माहिती भारतीय सुरक्षादलातर्फे व्यक्त करण्यात आली होती. आता दिल्ली पोलिसांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. तसेच संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रेदेखील प्रसिद्ध केली आहेत.

दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दल दोन्ही संशयित दहशतवाद्यांचा तपास करत आहेत. पंजाब आणि दिल्लीच्या ज्या भागांमध्ये, हॉटेल्समध्ये, विश्रामगृहांमध्ये परदेशी नागरिक येतात, त्या भागांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध करत या दहशतवाद्यांना पाहिल्यास त्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन नागिरकांना केले आहे.