नवी दिल्ली : दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने 1984 सालच्या शीखविरोधी दंगलीतील आरोपींना शिक्षा सुनावली आहे. आरोपी यशपाल सिंहला फाशी तर नरेश सहरावतला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीतील महिपालपूर भागात शीखविरोधी दंगलीदरम्यान हरदेव सिंह आणि अवतार सिंह यांची हत्या करण्यात आली होती. तब्बल 34 वर्षाने पीडितांना न्याय मिळाला.

पुराव्या आभावी 1994 मध्ये बंद करण्यात आलेल्या या केसला 2015 मध्ये पुन्हा सुरु करण्यात आलं. तसेच या महिन्याच्या 14 तारखेला कोर्टाने नरेश सहरावत आणि यशपाल सिंह यांना दोषी ठरवून, अटक करण्याचे आदेश दिले होते. पटियाला कोर्टाने आज या दोघांना शिक्षा सुनावली आहे.

या निर्णयाने आम्ही खुश आहोत, मात्र हा अर्धवट न्याय आहे. कारण दोघांनाही फाशी व्हायला हवी होती, असं मृतकांच्या नातेवाईकांनी सांगितलं. सज्जन कुमार आणि जगदिश टाइटलर मुख्य दोषी आहेत, त्यांना शिक्षा व्हायला हवी, असं नातेवाइकांचं म्हणनं आहे.