नवी दिल्ली : पॅन कार्डसाठी अर्ज करताना अर्जात वडिलांचे नाव लिहिणे अनिवार्य नाही, आयकर विभागाने पॅन कार्डबाबत असा नवा निर्णय दिला आहे. शिवाय अर्जदार व्यक्ती अर्जात वडिलांऐवजी आईचे नाव नमूद करु शकते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या अधिसुचनेनुसार पॅन कार्डच्या अर्जात हे दोन बदल करण्यात आले आहेत.

एखाद्या व्यक्तीचा सांभाळ वडिलांऐवजी एकट्या आईने केला असेल तर ती व्यक्ती पॅन कार्डसाठी अर्ज करताना आईचे नाव नमूद करु शकते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅन कार्डबाबत केलेल्या या नव्या बदलामुळे पॅन कार्डच्या अर्जात सिंगल पॅरेंट मदर असा पर्याय उपलब्ध असणार आहे.

पॅन कार्ड भारतात सुरु केल्यापासून त्यासाठीचा अर्ज करताना त्यामध्ये वडिलांचे नाव नमूद करणे बंधनकारक आहे. परंतु 5 डिसेंबरपासून पॅन कार्डचा अर्ज करताना वडिलांच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक नसेल.